शेअर मार्केट मधून किती नफा कमवता ? हाय रिस्क हाय रिटर्न हे गुंतवणुकीच्या जगात पाहिलं पाऊल ठेवणाऱ्या प्रत्यकाला ठासून शिकवलं जातं. मग प्रत्येकजण आपल्या धोका पत्करण्याच्या क्षमतेनुसार निर्णय घेतो आणि त्या पटीत पैसे कमावतो. शेअर मार्केट हि सगळ्यात रिस्की गुंतवणूक समजली जाते, क्रिप्टो कायदेशीर होत नाही तोपर्यंत, त्यामुळे ज्यांना जास्त धोका पत्करायचा आहे त्यांनीच यात गुंतवणूक करावी असे या क्षेत्रातील जाणकार सांगतात. परंतु पोस्ट कोविड मार्केट मध्ये आलेल्या तेजीने अनेक नवगुंतवणूकदारांचे डोळे दिपावले आणि मग कोणताही विचार न करता त्यांनी आपली सगळी बचत, काहींनी तर कर्ज काढून, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली. पोस्ट कोविड आलेल्या वादळात घोड्यांबबरोबर गाढव देखील पळत होते, गैरसमज करून घेऊ नका मी कंपन्यांच्या शेअर्स विषयी बोलतोय, यामुळे नवगुंतवणूकदारांनी कोणतेही स्टॉक निवडीचे नियम न वापरता वाटेल तिथे गुंतवणूक केली आणि त्यांना फार चांगला नफा देखील झाला, या मुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आणि मग काय इतर सगळ्या गुंतवणुकी मोडून गरज पडल्यास कर्ज काढून त्यांनी शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केली. पण पोस्ट कोविड वादळ शमलं आणि त्यामध्ये दिपावलेल्या डोळ्यांना आता स्पष्ट दिसायला लागला तो फक्त मागे उरलेला फुफाटा. जिथे वर्षभरात पैसे पाच दहा पट होण्याचे स्वप्न होते तिथे आता मुद्दल तरी वाचेल कि नाही याची चिंता सुरु झाली. शेवटी झाले असे कि नवगुंतवणूकदार नव्याचे नऊ दिवसच टिकले आणि जे टिकले ते खरे गुंतवणूकदार ठरले. तर माझा प्रश्न खऱ्या गुंतवणूकदारांनाच आहे, कि तुम्ही मार्केट मधून किती नफा कमावता ?
नफ्याचे सारेच हक्कदार, तोट्याचे मात्र स्वतःच मानकरी शेअर मार्केटमध्ये नफा कमवायचा म्हणजे काही खायचं काम नाही, अगदी अनुभवी जाणकार गुंतवणूकदार देखील सांगतात. फंडामेंटल स्टडी करून स्टॉक निवडा मग त्याचा टेक्निकल चार्ट रोजच्या रोज बघून खरेदी विक्रीच्या लेव्हल ठरवा, रोजच्या दशांतर्गत आणि जागतिक घडामोडींवर लक्ष ठेवा, विकेंडला पण आराम नाही तज्ज्ञांचे मत ऐकत बसा त्यावरून आपल्या गुंतवणुकींचा आढावा घ्या, रात्रभर डोळेताणून डाऊची चाल बघा, आणि मग आठवडा सुरु झाला कि सिंघवी साहेब आहेतच आपल्याला झोपेतून उठवायला. येवढं सगळं करून देखील काही आऊट ऑफ सिल्याबस गोष्टी घडणार जसं कोविड, रशिया-युक्रेन, ई. आणि घाम गाळून म्हणा किंवा डोळे ताणून म्हणा कमावलेला नफा डोळ्यादेखत निघून जाणार. इतके सगळं करून वर्षाच्या शेवटी सी.ए. कडे रिटर्न भरायला गेल्यावर जो राहिलेला मृगजळी नफा दिसतो त्याच्यावर तो आपल्याला शॉर्ट टर्म आणि लाँग टर्मचा कायदा सांगून टॅक्स भरायला लावणार. म्हणजे घरचं झालं थोडं आणि व्याह्यांनी धाडलं घोडं अशीच गत झाली म्हणायची. अशा परिस्थितीत प्रत्येक गुंतवणूकदाराला एकच प्रश्न पडतो कि मी नफा कमावला कि त्याचे तुकडे तोडायला सगळे हक्कदार उभे राहणार पण जेंव्हा मी तोटा सहन करतो तेंव्हा त्या दुःखाचा मानकरी मी एकटाच कसा ?
टॅक्स वाचवायची एकदम कायदेशीर शक्कल प्रत्येक गुंतवणूकदार जसा जास्तीत जास्त नफा व्हावा या साठी प्रयत्न करत असतो तसाच कमीत कमी टॅक्स भरायला यावा यासाठी देखील प्लांनिंग करत असतो. पण टॅक्स वाचवणे आणि टॅक्स बुडवणे यात फरक असतो. काही सल्लागार काही नफ्यातल्या गुंतवणूक दाखवूच नका असा सल्ला देतात किंवा कमी नफा दाखवतात या गोष्टी बेकायदेशीर झाल्या पण खरचं प्लांनिंग करायचं असेल तर काही कायदेशीर पर्याय देखील असतात त्यातलाच एक पर्याय वर्ष अखेरीस वापरता येण्यासारखा आहे. समजा मी वर्षभरात १०० रुपये नफा कमावला आहे, आता वर्ष संपल्यावर मला या १०० रुपयांवर टॅक्स भरावा लागणार,पण समजा मला तितक्याच रक्कमेचा तोटा झाला तर म्हणजे १०० रुपयांचा नफा आणि १०० रुपयांचा तोटा हा दोन्ही सेट ऑफ होऊन अंतिम नफा शून्य होईल आणि मला टॅक्स भरावाच लागणार नाही. तुम्ही म्हणताल यात काय अर्थ आहे जर नफ्या येवढाच तोटा झाला तर माझी तर कमाईपण शून्य झाली ना मग काय फायदा. नीट समजावून घ्या समजा आता मार्केट पडून पडून सूर्यापेक्षाही लाल झालेला आहे, प्रत्येकाच्या पोर्टफोलिओ मध्ये काही शेअर्स असे असतीलच जे लॉस मध्ये असतील तर आपण तो लॉस बुक करायचा आणि दुसऱ्या दिवशी तेच शेअर्स पुन्हा खरेदी करायचे, याने काय होईल कि नफ्याच्या विरुद्ध लॉस तर दिसेलच पण तुमचा पोर्टफोलिओ देखील तसाच राहील आणि पर्यायी तुमचा सगळा टॅक्स पण वाचेल. म्हणजे एका दगडात दोन पक्षी मेले एकतर मी टॅक्स वाचवला आणि दुसरे म्हणजे मी पडत्या मार्केटचा फायदा देखील घेतला. यात अजून एक फायदा असा होतो कि लालेलाल झालेल्या आपल्या पोर्टफोलिओला नवसंजीवनी मिळून सपपोर्टवर नवीन खरेदी असल्यामुळे नफापण लवकरच दिसायला लागतो. अर्थातच हे सगळं करत असतांना आपल्याला आपल्या सी.ए. ने शिकवलेला शॉर्ट टर्म आणि लॉन्ग टर्मचा कायदा विसरू नका नाहीतर बुक केलेला लॉस फक्त लॉस म्हणून अकाउंटमध्ये राहील आणि टॅक्स देखील भरावा लागेल.
हैप्पी इन्वेस्टींग !!
हैप्पी इयर एंडिंग !!