कोण म्हणतं लग्नाच्या गाठी देव स्वर्गात बांधतो?

लग्नासाठी उतावळे, लग्न झालेले, संसाराच्या उत्तरार्धातले आणि एकटे राहिलेले या सगळ्यांना एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे, लग्नाविषयी तुमचं मत काय ? उतावळे कदाचित म्हणतील आयुष्याच्या वाटेवरील सर्वात सुरेख वळण, लग्न झालेले म्हणतील वंशवेल तर उत्तरार्धातले जीवनाला निर्माण झालेला अर्थ आणि एकटे राहिलेले उजाड माळरानाला पडलेलं निसर्गाचं सुंदर स्वप्न…

सुंदर वळणावर उभे राहून सहप्रवासी शोधणाऱ्यांना विचारा त्यांच्या अपेक्षा, तरुण असेल तर तो सुंदर, प्रेमळ, सुशील असे अनेक विशेषणे लावेल तेच जर तरुणीला विचारलं तर श्रीमंत, एकुलता एक, शहरी (शक्यतो आई वडील गावाकडे), मनमिळावू अशा भरपूर अपेक्षा. आता जर आपण थोडं धाडस करून लग्नाच्या एक वर्षांनंतर दोघांनाही विचारलं की यातील किती अपेक्षा पूर्ण झाल्या, अर्थातच दोघांना वेगवेगळं भेटून, तर मात्र गमतीशीर गोष्टी समजतात. त्याने पहिल्या एक वर्षात किमान दहा वेळा लग्नाची सीडी बघितलेली असते हे कन्फर्म करण्यासाठी की जो प्रॉडक्ट डिस्प्ले केला होता तोच आपल्याला डिलिव्हर झाला का किंवा आपण निवडण्याची घाई तर नाही केली ना सगळे पर्याय बघायला पाहिजे होते का ! तिने तर आख्खा पाढाच वाचला त्याचे खेड्यातले आई वडील सुनबाईच्या हातचा शिरा खाण्यासाठी शहरात आले आणि त्यांना तो इतका आवडला की तिथेच स्थायिक झाले, मुलगा इतका श्रीमंत निघाला की रोज एक कोटीच्या गाडीने प्रवास करतो (बसने) आणि मनमिळावू तर इतका की विचारूच नका ! ज्यांनी रिझर्व्हेशन (लव्ह मॅरेज) केलं होतं त्यांनी तर उत्तर द्यायलाच नकार दिला.

लग्नापूर्वीचे गुलाबी दिवस लग्नानंतर राहत नाहीत

एकदा लग्न लावून दिलं कि देवसुद्धा खाली पाहत नाही

जन्मोजन्मीचं वैर काढत तो दिवसरात्र तिच्याशी भांडत असतो

कोण म्हणतं लग्नाच्या गाठी देव स्वर्गात बांधत असतो ?

इतका अपेक्षाभंग, याला नेमकं काय म्हणायचं अवास्तव अपेक्षा की त्या पडताळण्याचा चुकीचा निकष. खरचं इतक्या जास्त अपेक्षा आपण ठेवतो का आपल्या जोडीदाराकडून ? आणि ते देखील हे न तपासता की आपण स्वतः कुठल्या कसोटीवर खरे उतरले आहोत. अपेक्षाच ठेऊ नयेत असे नाही पण त्या माफक आणि रास्त असाव्यात म्हणजे जेमतेम उंचीच्या, सावळ्या बंटीने दिपीकाचे स्वप्न बघू नयेत असे नाही त्याने ते नक्की बघावेत पण तशी अपेक्षा ठेऊ नये म्हणजे मिळालीच तर आनंदच पण नाही मिळाली तर दुःख तर नक्कीच होणार नाही. अर्थात अपेक्षांचा हा रुसवा फुगवा एक किंवा फारतर दोन वर्षे चालतो एकदा मुलं झाली की खऱ्या संसाराला सुरुवात होते. मग काहीजण याला गाढवावर लादलेल्या ओझ्यासारखे खाली मान घालून आयुष्यभर वाहत असतात तर काही दिमाखदार घोड्यासारखे संसाररूपी गाडी ओढत असतात. आता जर गाडीच्या एका बाजूला घोडा असेल आणि एका बाजूला गाढव तर साहजिकच संसाराचा वेग मंदावणार. जबाबदारी तीच पण पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा कसा ? याचं कारण लग्न करतांना आपल्या जोडीदाराकडून ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण न होणं हे तर नाही ना ? त्या तर काळानुरूप बदलत गेल्या पाहिजे होत्या आता तुम्ही तिचे बाह्य सौंदर्य बघण्यापेक्षा तिच्यातील कुशल गृहिणी बघितली पाहिजे. तिनेदेखील खूप श्रीमंतीच्या अपेक्षा सोडून त्याच्यातील जबाबदार पती आणि पिता बघितला पाहिजे. मग अपेक्षा पडताळण्याचा निकष महत्वाचा ठरतोच ना ! जिथे तो योग्यपणे लावला जातो तिथे आयुष्याचा सुखद प्रवास सुरू होतो नाहीतर खाली मान घातलेल्या गाढवासारखं आयुष्यं घालवावं लागतं.

मुलांची लग्ने झाली नवीन संसार सुरू झाले आणि आपण आपल्या संसाराच्या उत्तरार्धात पोहोचलो आता कुठे लग्नाचा खरा अर्थ समजायला लागला, इतकी वर्षे तो समाजाला नव्हता असे नाही पण आतापर्यंत जबाबदाऱ्या पार पाडण्यातच आयुष्य गेलं आता कुठे वेळ मिळाला आहे एकमेकांसाठी. मग पुन्हा जुन्या कसोट्या लावायच्या पडताळणीच्या, खरतर आता गरजच राहिली नाहीये दोघेही आता एकमेकांना इतके समरूप झाले आहेत की एकदुसऱ्याचे स्वभाव, आवडी निवडी, आनंद दुःख सगळे सगळे एकरंग झाले आहेत. आता त्याला फरक नाही पडत की ती दिपीका सारखी दिसते कि नाही आता त्याला फक्त तिचा सहवास हवाहवासा वाटतो, तिच्या शिवाय एकाकी जगण्याची कल्पना सुद्धा त्याला करूशी वाटत नाही. आणि तिला पैशांपेक्षा आता त्याच्या वेळेची किंमत जास्त वाटते जे तो तिला आजवर देऊ शकला नाही, आताही ही वेळ रेतीसारखी हातातून पटकन घसरते आहे, ती पटकन संपून तर जाणार नाही ना याच्या भीतीने आहे तो क्षण कोणतीही अपेक्षा न करता पुरेपूर जगण्याचा प्रयत्न ती करत असते.

सुख हे वाळवंटातील मृगजळासारखे असते, तुम्ही आयुष्यभर त्याच्यामागे धावा ते कधी नजरेआड जाईल कळणारही नाही आणि मग हाती लागेल फक्त माती. पण म्हणून प्रवास थांबवायचा नसतो चालत राहायचं असतं नवीन सुखांच्या शोधात. एकटेपणाचं दुःख तर होणारचं पण सुख शोधायचं मुलांच्या सुखात. उजाड आयुष्य दुसरं काय करू शकतं, हा, स्वप्न बघू शकतं आपल्या जीवनातल्या सोनेरी क्षणांचं ! आता अपेक्षा पूर्ण झाल्या का हा प्रश्न किती गौण वाटतो, मला तर न मागताही बरंच काही मिळालं ही भावना असते, हा फक्त एकच गोष्ट कमी दिलीत….वेळ….

जिंदगी का सफर हे ये कैसा सफर कोई समझा नहीं कोई जाना नहीं !

हे ये कैसी डगर चलते ही सब मगर कोई समझा नहीं कोई जाना नहीं !

Leave a Comment