मनी मंत्राज् !

SIP करू, F&O करू, शेअर्स घेऊ, इन्शुरन्स पॉलिसी घेऊ कि FD करू ?, अगदी डोकं बधिर झालयं ! बरं कोणाला विचारायची पण सोय नाही. ज्याला विचारावं तो त्याच्याकडच्या प्लॅनचेच गुणगान गाणार आणि मग रोजचे कॉल सुरु, म्हणजे मग वेगळी डोकेदुखी. हे तर असं झालंय कि आधीतर पैसे कमवण्यासाठी रात्रंदिवस रक्ताचं पाणी करून कष्ट करा आणि नंतर त्या पैशांचं करायचं काय म्हणून रात्रंदिवस विचार करून डोक्याचं दही करा. आता बघा ना आपण प्रॉपर्टी मध्ये इन्व्हेस्ट करायचं म्हंटलं तर रिअल इस्टेट मध्ये मंदी, पैसे बँकेत ठेवले तर बँक बुडते, शेअर मार्केट मध्ये टाकले तर मार्केट कोसळते, काहीच न करता घरात ठेवले तर सरकार नोटा बंदी करते मग सामान्य माणसाने करायचे काय ?

आर्थिक अज्ञान हि सामान्य माणसाची सगळ्यात मोठी समस्या आहे. पैसे कमवण्याची अक्कल असणाऱ्या मोठमोठ्या डॉक्टर, इंजिनिअर, वकील, ई. लोकांची देखील हीच समस्या आहे पण हे लोक पैशाच्या झगमगाटाने अज्ञानाचा अंधकार दूर करू शकतात. सामान्य माणूस बळी पडतो फसव्या जाहिरातींवर, आधी अशा जाहिरातींचा न्यूज मीडिया मधून भडीमार होत होता आता तर सोशल मीडियामुळे याचा विस्फोटच झाला आहे, आपण यातील खोट्या आश्वासनांना बळी पडतो. एकतर आपले तुटपुंजे आर्थिक साम्राज्य त्यात प्रजाजनांच्या (कुटुंबातील लोकांच्या) आरोग्य, शिक्षण, ई. समस्या, आपण त्याचे स्वयंघोषित राजे त्यामुळे मालक मालक म्हणायला हाताखाली ठेवून घेतलेल्या सेवकांचा खर्च हे सगळं करता करता सिंहासनाचे सहाच्या सहा पाय कापायला लागतात आणि अशातच राजदरबारात जयघोष व्हावा तसा “सर” असा अदबशीर आवाज येतो, आपल्यासाठी आमच्याकडे करोडपती योजना आहे, अशावेळी त्या भांबावलेल्या राजाला गरज आहे मनी मंत्राजची. ते पुरवण्याचा हा सगळा खटाटोप

आपल्याकडील पैशाचे नियोजन करतांना सगळ्यात महत्वाचे असते भविष्याचा वेध, म्हणजे वर्षांचा विचार न करता दशकांचा विचार करावा लागतो, पुढील दहा वर्षांचे कुटुंबाचे इनकम आणि खर्च यांचा अंदाज बांधावा लागतो आणि मग शॉर्ट टर्म आणि लॉन्ग टर्म गुंतवणुकीची विभागणी करावी लागते. अर्थात हा आपला पुढच्या दहा वर्षांचा प्लॅन तयार झाला पण गुंतवणूक तर आता लगेच सुरु करायची आहे, ती करण्याआधी किती रकमेपासून सुरु करायचे हा प्रश्न अगदी सगळ्यांनाच पडतो. आपण असे गृहीत पकडूया कि आपले मासिक उत्पन्न १ लाख इतके आहे आणि घरखर्च आणि हफ्ते मिळून ६० हजार आहे म्हणजे ४० हजार रुपयांची दर महिन्याला बचत होते. आता प्लांनिंग करूयात कि हे पैसे कुठे गुंतवायचे जेणे करून रिटर्न्स देखील चांगले मिळतील आणि अडचणीच्या वेळी ते पटकन काढता देखील येतील. लक्षात घ्या आपण गुंतवणुकीचे प्लांनिंग दशकांचा विचार करून आधीच करून ठेवले आहे आता फक्त त्याची सुरुवात करायची आहे पण हे पूर्ण ४० हजार त्यात टाकणार का ? अजिबात नाही ! आधी काही महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत त्या म्हणजे हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म प्लॅन, या दोन गोष्टींशिवाय केलेली कोणतीही गुंतवणूक कधीच फलित होत नाही हे नेहमी लक्षात ठेवा, याचे कारण म्हणजे या दोन गोष्टी नसल्या आणि काही दुर्घटना घडली तर पहिला घाव आपल्या गुंतवणुकीवरच पडणार आहे, बरोबर ना ?

१) हेल्थ इन्शुरन्स (मेडिक्लेम) – मेडिक्लेम हा नेहमी कमी वयात सुरु केला पाहिजे आणि तो देखील संपूर्ण कुटुंबाचा असला पाहिजे. अनेकांचा समज असा असतो कि मी तर तरुण आहे मला काय धाड भरलीये झालं तरी सर्दी खोकला मग कशाला मेडिक्लेमचा खर्च, चाळिशीनंतर काढू. विचार करा आज तुमचे वय कमी आहे त्यात तुम्हाला काही आजार नाही त्यामुळे खूप कमी प्रीमियम मध्ये खूप जास्त किमतीचा विमा तुम्हाला मिळेल, त्यात मोठया आजारांसाठी काही वर्षांचा वेटिंग पिरियड असतो म्हणजे लगेच क्लेम मिळत नाही तो सुद्धा निघून जाईल आणि जेंव्हा खरंच गरज पडेल तेंव्हा मेडिक्लेम आपल्याला कामी येईल. काही जण तर देवाला नेवेद्य दाखवतो तसा इन्शुरन्स काढतात, विचार करा आपण मेडिक्लेम काढतो मोठ्या आजारांसाठी, आणि आजकाल हॉस्पिटलचा वाढता खर्च बघता तुम्ही काढलेली पॉलिसी खरंच पुरणार आहे का, हा प्रश्न स्वतःलाच विचारा, नाहीतर एकीकडे हफ्ता भरायचा आणि दुसरीकडे हॉस्पिटलचा अर्धा खर्चपण आपणच करायचा अशी वेळ यायला नको. तर मेडिक्लेमचा मंत्रा म्हणजे योग्य वयात, योग्य रक्कमेचा आणि योग्य कंपनीकडून काढलेला मेडिक्लेमच घ्या.

२) टर्म इन्शुरन्स – आरोग्य विमा हा काही गुंतवणुकीचा नाही तर विम्याचा प्रकार आहे हे नेहमी लक्षात ठेवा. आजकाल वाढत असलेल्या जाहिरातींना बळी पडू नका कॅशबॅक, चाईल्ड, रिटायरमेंट प्लॅन ऐकायला खुप छान आणि आकर्षक वाटत असले तरी त्यामध्ये ना धड विमा होतो ना धड गुंतवणूक होते, म्हणजे म्हणायला ऑलराउंडर प्लेअर पण एक ना धड असल्यामुळे नेहमी टीमच्या बाहेर अशी गत होऊन जाते. टर्म इन्शुरन्स काढण्यामागचा मुख्य उद्देश आपल्या नंतर आपण पाहिलेली स्वप्न आणि ती पूर्णत्वाला येण्यासाठी केलेली गुंतवणूक टिकून राहावी, घरच्यांना ती मोडावी लागू नये हा असतो, हे लक्षात ठेवा. विमा निवडताना आपल्या उत्पन्नानुसार जेवढा जास्तीत जास्त बसेल तेवढा निवडा, कमी वयात जर सुरुवात केली तर अगदी कमी प्रीमियम येतो आणि तो आयुष्यभर तेवढाच राहतो त्यामुळे वेळेत घ्या आणि जास्तीत जास्त घ्या. टर्म इन्शुरन्स कमावत्या व्यक्तीच्या जाण्याने कुटुंबाला जो आर्थिक फटका बसणार असतो त्याची भरपाई करून देतो त्यामुळे कमावते वय विचारात घ्या आणि तेवढ्या वर्षांसाठीच विमा घ्या, नाहीतर तुम्हाला आम्ही वयाच्या १०० वर्षांपर्यंत विमा देऊ शकतो असं कुणीतरी म्हणतंय म्हणून तिकडे आपले पैसे वाया घालवू नका. महत्वाची गोष्ट म्हणजे टर्म प्लॅन हे खुप दीर्घकालीन असतात त्यामळे कंपनीची निवड खुप महत्वाची असते, नाहीतर आपल्या आधी आपली कंपनी निकाली निघायला नको. तर टर्म प्लॅनचा मंत्रा म्हणजे कमी वयात, जास्तीत जास्त रकमेचा, योग्य कालावधी पुरताच आणि टिकाऊ कंपनी कडूनच टर्म प्लॅन घ्या.

या दोन गोष्टींना गुंतवणूक म्हणत नाही, त्यामुळे आपल्या ४० हजारांतून समजा या दोघांचे मिळून १० हजार कमी झाले तर राहिलेल्या ३० हजारांचा विचार आपण गुंतवणुकीसाठी करू शकतो. आता शॉर्ट टर्म मध्ये किती आणि लॉन्ग टर्म मध्ये किती हे आधी आपण ठरवलेलंच आहे त्यानुसार याची विभागणी सहज करता येईल. दोघांमध्ये कुठले कुठले पर्याय आहेत आणि आपलं वय, त्यानुसार येणारी रिस्क कॅरीइंग कॅपॅसिटी, लिक्विडीटी, मार्केट रिस्क, ई. गोष्टींचा विचार करून त्याची निवड कशी करावी याची चर्चा पुन्हा भेटल्यावर करू.

Leave a Comment