हो तुम्ही बरोबर ऐकलंत हेरा फेरीचा पुढचा भाग आलाय आणि त्याने महाराष्ट्रात अगदी धुमाकूळ घातलाय आणि विशेष म्हणजे हा रील मूवी नाहीये तर हा रिअल मूवी आहे ज्यामध्ये काम करणारे कलाकार, हिरो हिरोईन व्हिलन सगळे तुमच्या आमच्यातलेच आहेत, मूवीचं नाव आहे “हेरा फेरी ३ – द पॉन्झी सागा”
आधीच्या दोन भागांमध्ये आपण पाहिलं कि शाम आणि राजू दोघे आयुष्यातील आर्थिक समस्यांना कंटाळून झटपट पैसे कमवण्यासाठी कशी हेरा फेरी करतात आणि त्यात बाबुराव सारख्या साध्याभोळ्या मराठी माणसाला पैशांचे लालच दाखवून सहभागी करून घेतात. तसं पाहिलं तर सिनेमाचा हा फॉर्मुला काही नवीन नाही आधी कित्येक वेळा वापरलेला पण हेरा फेरीने धुमाकूळ घातला कारण यामध्ये निर्मात्याने लावलेला कॉमेडीचा तडका. तिघांच्या कॉमेडीला प्रेक्षकांनी लोटपोट होऊन दाद दिली.
तर आधी सांगितल्या प्रमाणे हा नवीन सिनेमा रिअल लाईफ आहे म्हणजे याची स्टोरी खरोखर आपल्या आजूबाजूला घडते आहे. याची स्टोरी सुरु झाली होती १०० वर्षांपूर्वी चार्ल्स पॉन्झी नावाच्या एका व्यक्तीने अवाजवी परताव्याचे आमिष दाखवून अनेक तरुणांना आपल्या जाळ्यात ओढले आणि जगात एका नवीन स्कॅमची सुरुवात केली ज्याला त्याच्याच नावने म्हणजे पॉन्झी स्कॅम म्हणून ओळख मिळाली. त्याकाळी बँक गुंतवणूकदारांना ५-६% परतावा देत होती पोन्झीने ४५ दिवसात ५०% तर ९० दिवसात १००% परताव्याचे आमिष दिले आणि लालची लोकांना आपल्या जाळयात ओढले. मग काय इसकी टोपी उसके सर हा खेळ त्याने सुरु केला म्हणजे एकाची गुंतवणूक तो दुसऱ्याचा परतावा असे चक्र सुरु झाले. कोणतीही नवीन गोष्ट सुरु झाली कि त्याला प्रश्नार्थक नजरेने बघणारे अनेक सामाजिक घटक असतातच पण इथे मात्र पॉन्झी तयारीनिशी उताराला होता त्याने दाखवायला एक व्यवसाय सुरु केला होता आणि त्यातूनच आपण इतका मोठा नफा कमावतो आहे कि लोकांना परतावा देणे सहज शक्य आहे असे सिद्ध केले. पॉन्झीवर लोकांचा भरवसा दुणावला आणि त्यांची गुंतवणूकदेखील. परंतु कालांतराने हे सिद्ध झाले कि व्यवसायातील गुंतवणूक हि लोकांनी केलेल्या गुंतवणुकीच्या अवघी काही टक्केच होती आणि मग मात्र त्याचे पितळ उघडे पडले. या स्कॅम मध्ये अनेक लोकांचे पैसे तर बुडालेच परंतु पॉन्झीने ज्या ज्या बँकांमध्ये पैसे ठेवले होते त्यांची अवस्था नदीत अंघोळ करणाऱ्या त्या गोपिकां सारखी झाली ज्यांची वस्त्रे कृष्णाने पळवली होती.
हेरा फेरी कथानकातील पात्रांचा भोळसरपणा आणि त्यामूळे त्यांची होणारी फसवणूक आणि नंतर त्यातून सुटण्यासाठीची त्यांची धडपड तरुणाईला फार भावते, बाबुरावच्या प्रत्येक विनोदावर तर शिट्ट्या पडतात, त्याचे मिम्स सोशल मीडियावर अक्षरशाः धुमाकूळ घालतात. हे सगळं करणारी आपली हुशार तरुणाई जेंव्हा वास्तविक आयुष्यात अशाच जाळ्यात अडकते तेंव्हा मात्र बाबुरावचा उठाले रे बाबा ! हा विनोद आठवतो. आणि मग यामागील कारणे शोधण्याची गरज निर्माण होते. माझ्यामते याची दोन मुख्य कारणे आहेत एक म्हणजे आपल्या पाचवीला पुजलेली बेरोजगारी आणि दुसरे म्हणजे आपल्या भरमसाठ गरजा, जुनी एक म्हण आहे, अंथरून पाहून पाय पसरावे पण आताच्या काळात त्यात थोडा बदल करून पाय पाहून अंथरून पसरावे असे म्हणायची वेळ आली आहे. नोकरी नाही त्यामुळे हातात पैसा येण्याचा मार्गच नाही आणि राहणीमान जर पहिले तर सिनेमातल्या हिरो हिरोईनला देखील लाजवेल या दर्जाचे, मग गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा आणणार तरी कुठून. मग अशा तरुणाईला एखादा अक्षय कुमार भेटतो आणि म्हणतो कि मेरे हाथ आमीर होनेका एक फॉर्मुला लगा हे, मग कशाची वाट पाहता आपली तरुणाई त्यालाच आयुष्याचे ध्येय बनवून झोकून देते.
चूक पॉन्झी स्कॅम करणाऱ्या पॉन्झी कंपन्यांची निश्चित आहेच, पण लक्षात घ्या जे विकतं तेच पिकत असतं, बाजार आहे म्हणून तर विक्रेते आहेत. खरं पाहिलं तर या सिनेमात व्हिलन कोणीच नाहीये एका बाजूला काही गरजू लोकं आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या गरजांचा व्यापार मांडणाऱ्या कंपन्या आहेत. गरजू ग्राहक संपले किंवा त्यांच्या गरजा कमी झाल्या कि कंपन्या बंद पडणार, हे निश्चितच आहे. मागील १०० वर्षांपूर्वी सुरु झालेली या सिनेमाची कथा आज देखील अविरत सुरूच आहे, नव्हे त्यात असंख्य नव्या पात्रांची भर पडली आहे, नवे पात्र नव्या घटना आणि असंख्य दर्शक यामुळे सिनेमा अगदी सुपरहिट सुरु आहे. मात्र न राहवून माझ्या मनात एका प्रश्नाने डोके वर काढले, ते म्हणजे या सिनेमाचा शेवट ? कुठेतरी हे संपणार कि नाही ? बाबुरावला हसणारी आपली तरुणाई आरशात बघून स्वतःवर हसेल ? अक्षयच्या आमिर होण्याच्या फॉर्मुलाला नकार देईल ? ज्या दिवशी हे घडेल तो दिवस ह्या रिअल लाईफ हेरा फेरीचा शेवट असेल.